बारामती: बारामती आणि पर्यायाने राज्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीतील पहिला महत्त्वपूर्ण निकाल जाहीर झाला असून, ‘ब वर्ग’ प्रवर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलसाठी हा एक मोठा बूस्टर मानला जात आहे.
‘ब’ वर्ग गटात अजित पवारांनी एकतर्फी विजय मिळवला. एकूण १०२ मतांपैकी १०१ मते वैध ठरली. यामध्ये अजित पवारांना तब्बल ९१ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ १० मते मिळाली. ‘सहकारी संस्था’ या गटातून अजित पवारांनी आपली ताकद सिद्ध केली आहे.
या निवडणुकीत आतापर्यंतच्या मतमोजणीच्या प्राथमिक माहितीनुसार, ‘क्रॉस व्होटिंग’ झाल्याचे चित्र समोर येत आहे. ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान झाले नसल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, काही गटात क्रॉस व्होटिंग झाल्याची माहिती आहे. मतपत्रिकांच्या छाननीमधून मिळणारा कल क्रॉस व्होटिंगकडेच निर्देश करत असल्याने सर्वच पॅनेलच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः पॅनेल टू पॅनेल मतदान करण्याचे आवाहन केले होते, त्यामुळे या क्रॉस व्होटिंगचा फटका कोणाला बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या या निवडणुकीत एकूण चार पॅनेल मैदानात आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील ‘निळकंठेश्वर पॅनेल’, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘बळीराजा बचाव पॅनेल’, चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार बचाव पॅनेल’ आणि ‘शेतकरी संघटनांचे कष्टकरी शेतकरी पॅनेल’ यांच्यात ही चौरंगी लढत झाली.
सध्या तरी मुख्य लढत अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेल आणि चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेलमध्येच असल्याचे दिसून येत आहे. बारामती येथील प्रशासकीय भवनमधील अभियांत्रिकी भवन येथे मतमोजणी सुरू असून, एकूण नव्वद उमेदवारांमधून २१ संचालकांची निवड आज केली जाईल. अजित पवारांच्या या पहिल्या दणदणीत विजयानंतर इतर गटांतील निकालांची उत्सुकता वाढली आहे.


