शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रा. लि. या कंपनीमध्ये कामावर आलेल्या कामगाराला त्रास झाल्यानतर कंपनी प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे रामपाल सताई दुशद या कामगाराचा मृत्यू झाल्याने कामगार व नातेवाईकांनी मृत कामगाराचा मृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवत आंदोलन केले. अखेर शिक्रापूर पोलिसांत कंपनी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदर कंपनीमध्ये रामपाल दुशद याची प्रकृती खालावली असताना त्याने त्याबाबतची माहिती कंपनीमध्ये दिली. मात्र त्यांनतर त्याला उलट्या होऊन देखील पाऊन तास कंपनीमध्ये रामपालला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. तसेच कंपनी प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली. रामपालवर उपचाराला वेळ लागल्याने मृत्यू झाला. दरम्यान, संतप्त कामगार व नातेवाईकांनी रामपालचा मृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवत आंदोलन केले. पोलिसांनी मध्यस्ती केल्याने मृत कामगारावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत अवधेशकुमार रामपाल दुशद (वय ३४ रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. पंचगावा पीपीगंज रा. फरदहनी जि. गोरखपूर उत्तरप्रदेश) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहेत.


