शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चौकात एका पीएमपीएमएल बसच्या चालकाने पुणे ते तळेगाव ढमढेरे मार्गावरील एका प्रवाशाला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. या प्रकरणाने नागरिकांनी बस चालकाविरुध्द संताप व्यक्त केला असून सदर बस चालकावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक व प्रवाशांनी केली आहे.
शिक्रापूर येथे पुण्याहून प्रवाशी घेऊन आलेल्या बस मधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवरील चालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने तसेच अपघात होईल अशा पद्धतीने बस चालवत असल्याने प्रवासी चौकात उतरले. यावेळी काही प्रवासी बस चालकाला जाब विचारात असताना बस चालकाने कमरेचा पट्टा काढून प्रवाशाला मारहाण सुरु केली. दरम्यान दुसऱ्या बाजूने आलेल्या बसच्या चालक व वाहकांनी देखील सदर चालकाला पकडून बस मध्ये बसण्यास सांगितले.
मात्र चालक नशेत असल्यामुळे कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. सदर बस चालकाच्या कृत्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याने नागरिक हैराण झाले असून बस चालकावर कारवाईची मागणी केली जात आहे. शिक्रापूर येथील घडलेल्या घटनेबाबत फोनवर माहिती मिळाली असून सदर व्हिडीओ बाबत माहिती घेऊन चौकशी करुन चालकावर कारवाई केली जाईल, असे बस आगार व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले.


