पुणे : परदेशी चलन व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १९ लाख ५३ हजारांचे परदेशी चलन लांबविल्याची घटना बालेवाडी भागात घडली. चोरट्यांनी लांबविलेल्या चलनात अमेरिकन डॉलर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, तसेच चीनमधील चलनाचा समावेश आहे.
याबाबत रोहित दिलीप मालुसरे (वय ४०, रा. सोमवार पेठ) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडीतील यशोद चौकात भागात मालुसरे यांचे कार्यालय आहे. एका इमारतीत असलेल्या कार्यालयातून ते परदेशी चलनाचे व्यवहार करतात. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडले. चोरट्यांनी कार्यालयातील रोकड, तसेच विविध देशातील चलन असा १९ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दुकानातून २५ हजारांची रोकड लांबविली
कोथरूड भागातील एका चष्मे विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातून २५ हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत किशोर तळेकर (वय ३६, रा. लक्ष्मणकला हाईट्स, शेलार मळा, कात्रज) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कर्वे स्स्त्यावर कोथरूड बसस्थानकासमोर लुणावत कॉम्प्लेक्स इमारतीत टायटन आयवेअर लेन्स अँड स्पेक्टस दुकान आहे. बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गल्ला उचकटून चोरट्यांनी २५ हजारांची रोकड लांबविली.


