नवी दिल्ली: विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशातील रिअल इस्टेट बाजारपेठेत देशांतर्गत भांडवलाचा ओघ ५३ टक्क्यांनी वाढून १.४ अब्ज डॉलर्सवर गेला असून एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत हे प्रमाण ४८ टक्के आहे. पहिल्या तिमाहीत स्थिर सुरुवात केल्यानंतर, २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत रिअल इस्टेटमधील संस्थात्मक गुंतवणुकीत लक्षणीय २९ टक्के वाढ होऊन ती १.७ अब्ज डॉलर्स झाली, असे कॉलियर्सच्या अहवालात म्हटले आहे.
परिणामी, पहिल्या सहामाहीत एकूण गुंतवणूक ३.० अब्ज डॉलर्स झाली आहे. जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणातही रिअल इस्टेट क्षेत्राची लवचिकता भक्कम असल्याचे अधोरेखित होते. २०२१ पासून गुंतवणुकीचे प्रमाण सुमारे २.६ अब्ज डॉलर्स या सहामाही सरासरीपेक्षा जास्त आहे. देशांतर्गत गुंतवणुकीचा वाढता ओघ भांडवली गुंतवणुकीच्या क्षेत्रात सुरू असलेला बदल प्रतिबिंबित करतो. यामध्ये संस्थात्मक गुंतवणूकदार प्रमुख मालमत्ता वर्गांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात अधिक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
देशातील रिअल इस्टेट गुंतवणुकीत देशांतर्गत भांडवल हा एक प्रमुख चालक म्हणून उदयास आला आहे. एकूण गुंतवणुकीत त्याचा वाटा २०२१ मध्ये १६ टक्क्यांवरून २०२४ मध्ये ३४ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा कॉलियर्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बादल याज्ञिक यांनी व्यक्त केली.
तसेच निवासी मालमत्तेने ०.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित केली असून त्याचे प्रमाण २७टक्के होते. त्यानंतर कार्यालयीन मालमत्तेचा २४ टक्के वाटा आहे. पहिल्या सहामाहीत मिश्र वापराच्या मालमत्तेतील गुंतवणुकीतही उल्लेखनीय वाढ असून ती गेल्या वर्षातल्या याच कालावधीतील ७ टक्क्यांच्या तुलनेत २० टक्क्यांहून अधिक होती, असे अहवालात नमूद केले आहे.


