बारामती : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या दारिद्र रेषेखालील व अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थिनींना उपस्थिती भत्त्यापासून वंचित ठेवले. याप्रकरणी बारामती तालुक्यातील ५३ मुख्याध्यापकांवर एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यासह उपस्थिती भत्त्याची रक्कम वसूल करण्याची कारवाई जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी केली.
सामाजिक कार्यकर्ते पोपट विठोबा धवडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर शिक्षणाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. याच प्रकरणात सहभागी चार केंद्रप्रमुखांपैकी सध्या कार्यरत एकावर दोन वेतनवाढी तात्पुरत्या स्वरूपात रोखणे, तर सेवानिवृत्त तीन केंद्रप्रमुखांचे दहा टक्के निवृत्ती वेतन एक वर्षासाठी रोखण्याची कारवाई झाली आहे. तीन विस्तार अधिकाऱ्यांवरही केंद्रप्रमुखांप्रमाणेच कारवाई केली आहे.
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी ही कारवाई केली असुन, उपस्थिती भत्त्याचे वाटप न करता जबाबदारीचे उल्लंघन केल्याची तक्रार धवडे यांनी दाखल केली होती. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर भत्त्याची माहिती सादर न करणे, मुख्याध्यापक पदाच्या जबाबदारीचे पालन न करणे व जिल्हा सेवा वर्तणुकीच्या नियमाचा भंग करणे असे आरोप सिद्ध झाल्याने ही कारवाई केली गेली. दरम्यान, याबाबत केलेली कारवाई समाधानकारक नाही. त्यामुळे या प्रकरणी आपण जनहित याचिका दाखल करणार असल्याचे पोपट धवडे यांनी सांगितले.


