नवी दिल्ली : येमेनमध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेचा सामना करणारी भारतीय नर्स निमिषा प्रिया हिच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. निमिषाला बुधवारी फाशी देण्यात येणार होती. परंतु, तिची फाशी स्थगित करण्यात आल्याने तिच्या सुटकेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभावशाली धार्मिक नेत्यांनी मध्यस्थी केल्यामुळे प्रियाची फाशी स्थगित करण्यात आली आहे. केरळच्या कंथापूरम येथील ग्रैंड मुफ्ती एपी अबूबक मुसलियार आणि येमेनमधील प्रसिद्ध सुफी विद्वान शेख हबीब उमर बिन हाफिज हे प्रियाच्या सुटकेसाठी प्रयत्न व चर्चा करत आहेत. मृत उद्योजकाच्या कुटुंबीयांना ब्लड मनी अर्थात नुकसान भरपाई म्हणून मोठा आर्थिक मोबदला देऊन प्रिया हिची सुटका करण्याचा प्रयत्न आहे. सेव्ह निमिषा प्रिया नामक एका संघटनेच्या माध्यमातून हा ब्लड मनी गोळा करण्यात आला आहे. निमिषाच्या पतीने तिच्या फाशीला स्थगिती मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच लवकरच तिची सुटका होऊन ती मायदेशी परत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील परिचारिका प्रियाला २०१७ साली येमेनमधील उद्योजकाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
तलाल अब्दो महदी नामक हा उद्योजक आणि प्रिया यांनी भागीदारीने एक क्लिनिक सुरू केले होते. महदीने निमिषाचा पासपोर्ट हिसकावून घेतला होता. तसेच तो तिचा छळ करायचा. महदीचा अमली पदार्थाच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. मात्र या मृत्यूसाठी निमिषाला जबाबदार धरण्यात आले. २०२० मध्ये तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याविरोधात तिने केलेली अखेरची याचिका देशाच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने २०२३ मध्ये फेटाळली. ती सध्या येमेनची राजधानी सना येथील एका तुरुंगात आहे. हा प्रदेश इराण समर्थिक हौती बंडखोरांच्या नियंत्रणात आहे. प्रियाच्या सुटकेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आल्याचे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले होते.


