तेल अवीव : गाझा पट्टीत पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना ‘हमास’ सोबत युद्ध सुरू असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांना मोठा धक्का बसला आहे. नेतन्याहू यांच्या आघाडी सरकारमधील प्रमुख सहकारी असलेल्या पुराणमतवादी पक्षाने सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नेतन्याहू यांचे सरकार अस्थिर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
युनायटेड टोरा जुडिइम पक्षातील दोन गटांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली आहे. एका कायद्यावरून असहमती निर्माण झाल्यामुळे आपण सरकारला लक्ष्य करत असल्याचे या पक्षाने म्हटले आहे. प्रस्तावित कायद्यानुसार सैन्य सेवा कठोरपणे अनिवार्य करण्यावर भर देण्यात आला आहे. तर युनायटेड टोरा जुडिइम पक्षाच्या सदस्यांपैकी अनेज जण सैन्यात भरती होण्याऐवजी ज्यू धर्मग्रंथाचा अभ्यास करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे यावरून ज्यू इस्रायलीमध्ये फूट निर्माण झाली आहे. गाझातील युद्धसंघर्ष वाढल्यामुळे सैनिकांची मागणी वाढलेली असताना ही दुही आणखी वाढत चालली आहे.
इस्रायलच्या राजकारणात प्रदीर्घ काळापासून जुडिझ्म पक्षाने ‘किंगमेकर’ ची भूमिका बजावली आहे. हा पक्ष बाहेर पडल्यामुळे नेतन्याहू सरकारला लागलीच कोणताही धोका नाही; पण ४८ तासांत प्रस्तावित कायदा मंजूर झाल्यानंतर नेतन्याहू सरकारकडे अल्प बहुमत राहणार आहे. अशा स्थितीत नेतन्याहू यांना दोन अतिउजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या भूमिकेवर अवलंबून राहावे लागणार आहे. या दोन्ही पक्षांचा गाझात शस्त्रसंधी करण्याला विरोध आहे.


