छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर येथून शेगावला जाणाऱ्या भाविक यात्रेकरूंना आता वंदे भारत रेल्वेची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही रेल्वे पुणे येथून निघणार असून या रेल्वेला दौंड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना येथे थांबे दिले जाणार आहेत. धार्मिक यात्रेकरूंना या ट्रेनचा लाभघेता येणार आहे. पुण्यातून अनेक भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जात असतात.
पुणे शहराला रेल्वेकडून ४ वंदे भारत ट्रेनची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे पुणे शहराची हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. या ४ वंदे भारत ट्रेनमुळे शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगावला जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे.
पुणे-वडोदरा वंदे भारत ट्रेन लोणावळा, पनवेल, वापी, सुरत या ठिकाणी थांबण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यावरून वडोदऱ्याला जाण्यासाठी ९ तासांचा वेळ लागतो, मात्र वंदे भारतने हा प्रवास ६ ते ७ तासांत होणार आहे. या ट्रेनमुळे व्यावसायिकांना खास फायदा होणार आहे. यामुळे मुंबई-पुणे-गुजरात कॉरिडॉरची कनेक्टिव्हिटी देखील सुधारणार आहे.
पुणे-नागपूर स्लीपर वंदे भारत सुरु होणार
रेल्वे मंत्रालय सध्या स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्न शील आहे. पुणे आणि नागपुर दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु केली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्राची उपराजधानी आणि सांस्कृतीक राजधानी जोडली जाणार आहे. या स्लीपर ट्रेनमुळे दोन्ही शहरांमधील व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना फायदा होणार आहे.


