कोलंबो: आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. हा सामना दोन्ही संघांसाठी चढउतारांनी भरलेला होता, पण बांगलादेशची चमकदार रणनीती आणि खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे त्यांना विजय मिळवून दिला. हा विजय त्यांच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे.
बांगलादेश संघाचा ऐतिहासिक विजय
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत २० षटकांत ७ गडी गमावून १३२ धावा केल्या. सुरुवातीला संघाला काही धक्के बसले, पण पाथुम निसांकाने ४६ आणि दासुन शनाकाने ३५ धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. कामिंदू मेंडिसनेही २१ धावांचे उपयुक्त योगदान दिले. मात्र, बांगलादेशच्या गोलंदाजांनी, विशेषत: मेहदी हसनने चमकदार कामगिरी करत ४ गडी बाद केल्याने श्रीलंकेचा डाव डळमळीत झाला. फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीवर मदत मिळत होती, ज्याचा फायदा बांगलादेशने घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशी संघाने १६.३ षटकांत १३३ धावा करत सामना जिंकला. मात्र, बांगलादेशची सुरुवात काही खास राहिली नाही आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी आपली पहिली विकेट गमावली . दुसरीकडे तंजीद हसनने तुफानी खेळी करत संघाला पुन्हा विजयाकडे नेले. तंजीद हसनने 47 चेंडूत नाबाद 73 धावांची खेळी केली , ज्यात 1 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. याशिवाय कर्णधार लिटन दासने ३२ आणि तौहीद हृदयने नाबाद २७ धावांची खेळी केली.
पहिला सामना गमावल्यानंतर मालिका जिंकली
याआधी श्रीलंकेने मालिकेतील पहिला सामना जिंकला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने शानदार पुनरागमन करत १-१ अशी बरोबरी साधली. बांगलादेशने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयाचा नायक ठरला बांगलादेशचा कर्णधार लिटन दास. लिटन दासने या मालिकेत ११४ धावा केल्या आणि त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले .


