नगरसूल : येवला नांदगाव राज्यमार्ग २५ रस्त्यावर नगरसूल जवळील वळणावर मारुती व्हॅन आणि मोटरसायकलच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. येवल्याहून नांदगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी एमएच १५ के बी ९७०३ व नांदगावहून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या मारुती व्हॅन यांच्यात नगरसुल बाजारतळाजवळील वळणार जोरदार अपघात झाला. यावेळी दुचाकीचालक रोहित भाऊसाहेब जाधव (रा. येवला) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचाराकरिता येवला येथे नेत असताना त्याचा मुत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी येवला यांनी दिली.
रोहित हा येवला कचेरी रोडवरील रहिवाशी आहे. दरम्यान, येवला नांदगाव राज्य मार्ग २५ वरील नगरसुल जवळील अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांची वचकच राहिला नसल्याचे मत व्यक्त करीत ग्रामस्थांनी सोशल मिडीयावर तीव्र शब्दातं प्रतिक्रिया नोंदविली आहे.


