नवी दिल्ली : विरोधकांची इंडिया आघाडी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संयुक्त उमेदवार उतरवू शकते. आघाडीतील सर्व घटक पक्षांसोबत विचारविनिमय केल्यानंतरच यावर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांनी उमेदवार द्यायला हवा, अशी अनेक नेत्यांची भावना आहे.
निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी यातून विरोधकांच्या एकजुटीचा संदेश जाईल, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या राजीनाम्यासाठी तब्येतीचे कारण सांगितले असले, तरी अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाने या पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पुढील महिन्यात ही निवडणूक होऊ शकते. सध्या संसदेत ७८२ खासदार असून, विजयासाठी ३९२ मतांची गरज आहे. एनडीएचे २९३ तर इंडिया आघाडीकडे २३४ संख्याबळ आहे. एनडीएकडे राज्यसभेत १३० तर इंडियाकडे ७९ खासदार आहेत


