मालेगाव : पतीसह सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळलेल्या विवाहितेने आपल्या दोन लेकरांसह विहिरीत उडी घेत मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील सौंदाणे येथे घडली. हर्षाली राहुल अहिरे (२७), मुलगी आरोही (७), मुलगा संकेत (५) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पतीसह सासरे, सासू, नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मालेगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गुरुवारी सकाळी सौंदाणे येथे शेतातील विहिरीत तिघांचे मृतदेह आढळले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढून सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. मुलीच्या व नातेवाईकांना मृत्यूची वार्ता कळताच हर्षालीच्या आई-वडिलांसह माहेरच्या (धाडरे, ता. जि. धुळे) नातेवाईकांनी सामान्य रुग्णालयात धाव घेतली. सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक, शारीरिक छळाला कंटाळूनच हर्षालीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करीत, हर्षालीचा पती राहुल अहिरे, सासरे दिलीप अहिरे, सासू कांताबाई अहिरे, नणंद सपना यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. हर्षालीच्या सासरच्या लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत तिच्या माहेरच्या लोकांनी पोलिसांना घेराव घातला. याबाबत तत्काळ दखल घेत मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह पथकाने राहुल अहिरे आणि दिलीप अहिरे यांना अटक केली आहे. हर्षालीसह आरोही व संकेत यांच्या पार्थिवांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हर्षालीचे वडील धर्मा देवरे महणाले की, राहुल अहिरे याने हर्षालीला विहिरीत ढकलून देईन, अशी धमकी आम्हाला दिली होती. तिला यापूर्वी देखील अनेकदा मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न सासरच्या मंडळीने केला होता. आतादेखील हर्षाली आणि दोघा नातवंडांना सासरच्यांनी मारून विहिरीत टाकल्याची आमची तक्रार आहे.


