नवी दिल्ली: दररोज ७,००० पावले चालल्याने कर्करोग, मधुमेह, नैराश्य, स्मृतिभ्रंश यासारखे गंभीर आरोग्य धोके कमी होऊ शकतात. एवढेच नाही, तर अकाली मृत्यूचा धोकादेखील ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
‘द लॅन्सेट’ नामक आरोग्यविषयक नियतकालिकात यासंदर्भातील एक अभ्यास अहवाल प्रकाशित झाला आहे. या अहवालात ५७ अभ्यासांचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये १ लाख ६० हजारांहून अधिक प्रौढ व्यक्तींच्या माहितीचा समावेश होता. या अभ्यासात असे आढळून आले की, दररोज ७,००० पावले चालल्याने हदयरोगाचा धोका २५ टक्के, कर्करोगाचा धोका ६ टक्के, टाईप २ मधुमेहाचा धोका १४ टक्के, डिमेंशियाचा (स्मृतिभ्रंश) धोका ३८ टक्के आणि नैराश्याचा धोका २२ टक्के कमी होऊ शकतो. तुमची रोज ७हजार पावलांची वाटचाल तुमचा अकाली मृत्यूचा धोका सुमारे ५० टक्क्यांनी कमी करू शकते, असे अहवालात म्हटले.
सध्या दररोज १० हजार पावले चालणे हे अनौपचारिक लक्ष्य मानले जाते; परंतु कमी सक्रिय असलेल्या लोकांसाठी ७हजार पावलांचे लक्ष्य अधिक व्यवहार्य असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. ‘सक्रिय व्यक्तींसाठी १०,००० पावले योग्य असू शकतात; परंतु दररोज ७,००० पावले आरोग्यात लक्षणीय सुधारणा घडवून आणतात,’ असे ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील चार्ल्स पर्किन्स सेंटरचे प्राध्यापक डिंग डिंग म्हणाले. अभ्यासात असेही आढळून आले की, दररोज फक्त ४,००० पावले चालल्याने २००० पावलांपेक्षा चांगले आरोग्य फायदे मिळतात. काही प्रकरणांमध्ये जसे की, हृदयरोग, ७,००० पेक्षा जास्त पावले चालणे फायदे देते असे दिसते; परंतु बहुतेक आजारांमध्ये ७ हजारांच्या पातळीवर फायदे स्थिर राहतात.
संशोधकांनी काही मर्यादादेखील मान्य केल्या. वय-विशिष्ट विश्लेषणाच्या अभावासारख्या घटकांमुळे कर्करोग आणि स्मृतिभ्रंशाबाबतचा आपला अभ्यास मर्यादित असल्याचे अभ्यासकांनी नमूद केले आहे. तरीसुद्धा या अभ्यासातून असे सूचित होते की, दररोज पावले मोजणे हा शारीरिक हालचाली मोजण्याचा एक सोपा मार्ग आहे. हा लोकांना चालण्यास प्रेरित करू शकणारा एक सोपा आणि व्यावहारिक उपाय आहे. हे निष्कर्ष भविष्यातील सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांना आकार देऊ शकतात, असा विश्वास अभ्यासकांनी व्यक्त केला.


