तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन गाभाऱ्यात १ ते १० ऑगस्ट २०२५ या काळात पुरातत्त्व विभागामार्फत जीर्णोद्धाराचे काम सुरू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर सदरील काळात श्री तुळजाभवनी मंदिरातील धर्म व देणगी दर्शन बंद राहणार आहे; परंतु नित्योपचार पूजा व धार्मिक विधी सुरळीत चालू राहणार असल्याची माहिती श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
श्री तुळजाभवानी देवीच्या सिंह गाभाऱ्यातील वरच्या बाजूचे प्लास्टर त्याची कार्यक्षमता संपल्याने काढून तेथे आता चुन्यात काम केले जाणार आहे. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली पश्चिम बंगालचे दोन व मध्य प्रदेशचे तीन कारागीर हे काम करणार आहेत. पुरातत्त्व खात्यामार्फत हे काम हाती घेण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
या दरम्यान देवीचे सिंहासन पूजन, अभिषेक पूजा व मुखदर्शन नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत; परंतु देणगी व धर्म दर्शन या कालावधीत बंद राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे.


