पुणे: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला नवे नाव राजगड असे देण्यात आले आहे. राजगड या नावाला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे हा तालुका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. वेल्हे तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायती आणि पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. आता राजगड या नावाला केंद्र सरकारची मान्यता देखील मिळाली आहे. लवकरच महाराष्ट्र सरकारचे राजपत्र जारी होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये राजगड, तोरणासारखे मोठे ऐतिहासिक किल्ले आहेत. ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे आणि स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांकडून ही मागणी करण्यात होती. आता ही मागणी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे.


