दौंड: पुणे-सोलापूर महामार्गावर यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन कारची भीषण धडक झाली. बुधवारी (ता 20) रात्री झालेल्या या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश भोसले हा आपल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारने पुणे-सोलापूर महामार्गावरून निष्काळजीपणे व नियमांचे उल्लंघन करून वेगाने जात होता, यावेळी त्याने उरुळीकडे निघालेल्या स्विफ्ट डिझायर या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर थोरबोले (वय 50, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) व गणेश दोरगे (वय 28, रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच या भीषण अपघातात पाचजण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. या अपघातातील आरोपीवर कलमांतर्गत बीएनएस कलम ९०६(९). २८१. ९२५(अ). ९२७ (ब). ३२४ (४) (७) मो.वा. कायदा कलम १८४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


