ठाणे: शनिवारी (दि.६) अनंत चतुर्दशीमुळे सार्वजनिक रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व गर्दी यामुळे महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई-ठाण्यासह संपूर्ण कोकणातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांना एक दिवसाची अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर करून “अनंत चतुर्दशी ” निमित्त कोकण विभागातील सर्व महाविद्यालयांना एकदिवसीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती.
आमदार डावखरे यांनी सुट्टीची मागणी करताना म्हटले होते की, कोकणात “अनंत चतुर्दशी” हा सण अत्यंत श्रद्धा व उत्साहाने साजरा केला जातो. गणेशोत्सव काळात विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण कोकणात सार्वजनिक वाहतूक, गर्दी आणि स्थानिक पोलीस यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होतो. तसेच, अनेक विद्यार्थी व प्राध्यापक हे आपल्या गावी गेलेले असल्याने या दिवशी महाविद्यालयांमध्ये उपस्थिती ठेवणे शक्य होत नाही.
त्या अनुषंगाने, कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यांतील सर्व महाविद्यालयांना “अनंत चतुर्दशी”निमित्त एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी डावखरे यांनी केली होती.


