सातारा : सातारा जिल्ह्यातील परळी खोऱ्यातील कारी गावात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गर्भवती माता ऋतुजा विशाल मोरे (वय 27) यांनी त्यांच्या दोन मुलींसह विहिरीत उडी मारली. या दु:खद घटनेत ऋतुजा आणि त्यांची 3 वर्षीय मुलगी स्पृहा विशाल मोरे यांचा मृत्यू झाला, तर 6 वर्षीय मुलगी त्रिशा विशाल मोरे यांना स्थानिकांनी वाचवले. ऋतूजांच्या गर्भातील अर्भकाचाही या घटनेत अंत झाला. या घटनेने कारी गाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा आणि त्यांचे कुटुंब उद्योगधंद्यासाठी मुंबईत राहतात. गणेशोत्सवासाठी ते आपल्या मूळ गावी, कारी येथे आले होते. गणेशोत्सव संपल्यानंतर ते पुन्हा मुंबईला परत जाणार होते. मात्र, कौटुंबिक वादातून ऋतुजा यांनी राहत्या घरापासून काही अंतरावरील विहिरीत आपल्या दोन मुली, त्रिशा आणि स्पृहा, यांना घेऊन उडी मारली. ही घटना शुक्रवारी (5 सप्टेंबर 2025) रात्री उशिरा घडली.
स्थानिकांनी दाखवले शौर्य
विहिरीजवळ गावातील काही युवक हराळी (द्रुवा) काढत होते. त्यांना अचानक लहान मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने धावत गेल्यावर त्यांना विहिरीत एक मुलगी झाडाच्या फांदीला धरून लटकलेली दिसली, जी मोठ्याने ओरडत होती. ही मुलगी त्रिशा होती. स्थानिकांनी तात्काळ तिला वाचवले. मात्र, विहिरीत ऋतुजा आणि त्यांची छोटी मुलगी स्पृहा यांचे मृतदेह आढळले. गावकऱ्यांनी तातडीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले आणि पोलिसांना माहिती दिली.
या घटनेची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, कौटुंबिक वाद हे या घटनेचे कारण असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सातारा पोलिसांनी स्थानिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.


