पुणे: पिंपरी चिंचवड येथील एका मल्टिप्लेक्समध्ये एक अनोखी घटना घडली असून, चित्रपटाचा सस्पेन्स उघड केल्याच्या कारणावरून प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाली आहे. या घटनेत तक्रारदार आणि त्याच्या पत्नीला मारहाण करण्यात आली आली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात चिंचवडमधील एका मल्टिप्लेक्समध्ये ‘द कॉन्ज्युरिंग – लास्ट रीट्स’ हा हॉरर चित्रपट सुरू होता. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीला कथानक मोठ्या आवाजात सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे इतर प्रेक्षकांना चित्रपटाचा सस्पेन्स बिघडत असल्याने अस्वस्थता निर्माण झाली.
समोर बसलेल्या तक्रारदाराने त्या व्यक्तीला शांतता राखण्यास सांगितले. मात्र या बोलण्याचा राग येऊन आरोपी संतापला. त्याने तक्रारदाराशी उर्मटपणे वागून त्याला मारहाण केली. इतकेच नव्हे तर तक्रारदाराच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली. या झटापटीत तक्रारदाराला किरकोळ दुखापत झाली.
पोलिसांत गुन्हा दाखल
घटनेनंतर पीडित दाम्पत्याने चिंचवड पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 117 (सार्वजनिक गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे), कलम 115 (प्रेरणा देणे), कलम 352 (हल्ला) तसेच भारतीय न्याय संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सुरू असल्याचे चिंचवड पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकारामुळे चित्रपटगृहातील सुरक्षेवर आणि प्रेक्षकांच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


