Nepal Protests: नेपाळ सध्या भीषण हिंसाचाराच्या जाळ्यात सापडले आहे. देशातील तरुण पिढी, विशेषतः जनरेशन-झेड, सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरली असून परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओलींना अखेर राजीनामा द्यावा लागला. अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक जखमी झाले आहेत. निदर्शकांनी केवळ रस्त्यांवर दगडफेक-जाळपोळ केली नाही, तर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, सिंह दरबार प्रशासकीय केंद्र, राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांचे निवासस्थान यांनाही लक्ष्य केले.
आंतरराष्ट्रीय प्रतिसाद
भारतासह रशियानेही नेपाळला शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना नेपाळ प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला दिला असून, आधीच नेपाळमध्ये असलेल्यांना गर्दी टाळणे व सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तुरुंगातून कैद्यांचे पलायन –
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशातील तुरुंगसुद्धा सुरक्षित राहिले नाहीत. पोखरा तुरुंगातून तब्बल 900 कैदी पसार झाले आहेत. नाखू तुरुंगात निदर्शकांनी हल्ला करून सर्व कैद्यांना सोडवले. तसेच जलेश्वर तुरुंगातून 572 कैदी भिंत तोडून बाहेर पडले.
विमानतळ व मंदिर बंद
हिंसाचारामुळे नेपाळमधील सर्व विमानतळ बंद करण्यात आले आहेत. काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा लष्कराने घेतला असून बुधवारी सायंकाळपर्यंत उड्डाणे पूर्णपणे स्थगित आहेत. दरम्यान, देशातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक असलेले पशुपतिनाथ मंदिर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
लष्कर आणि UN चे आवाहन
दरम्यान, लष्कराने प्रमुख शहरांमध्ये गस्त सुरू केली असून जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तथापी, UN सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करताना, निदर्शनांत मानवाधिकारांचा आदर व शांततेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.


