Dahisar Toll Plaza: मुंबई आणि उपनगरातील लाखो प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दैनंदिन वाहतूक कोंडीचे कारण ठरत असलेला दहिसर टोल प्लाझा लवकरच हलवला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने दिवाळीपूर्वी हा टोल त्याच्या सध्याच्या ठिकाणापासून 2 किलोमीटर पुढे हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
का घेण्यात आला निर्णय?
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेला दहिसर टोल प्लाझा दररोज वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनला होता. येथे अनेकदा 30 ते 60 मिनिटांपर्यंत गाड्यांच्या रांगा लागत असल्याने नागरिकांचा मौल्यवान वेळ वाया जात होता. यामुळे इंधनाचा अपव्यय होत होता आणि प्रदूषणातही वाढ होत होती. मीरा-भाईंदर, दहिसर आणि ठाण्यातील सुमारे 15 लाख रहिवासी आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या समस्येला रोज सामोरे जावे लागत होते.
टोल कुठे हलवला जाणार?
सरकारच्या योजनेनुसार, हा टोल प्लाझा सध्याच्या ठिकाणाहून 2 किमी पुढे, वर्सोवा पुलाजवळील एका नर्सरी परिसरात हलवला जाईल. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार हे काम पूर्ण करण्यास 1 ते 1.5 महिने लागतील. हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला स्थानिक आमदार, एमएसआरडीसी आणि एनएचएआयचे अधिकारी, पोलिस आयुक्त तसेच टोल ऑपरेटर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, ‘सध्याचा टोल प्लाझा वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी अनेक टोल रद्द करण्यात आले असून छोट्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दहिसर टोलची समस्या देखील संपवली जाणार आहे.’ आता हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. मंजुरी मिळताच कामाला गती मिळेल आणि दिवाळीपूर्वी प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.


