जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी एकापाठोपाठ धक्के बसत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जळगावसह खानदेशात पक्षाच्या अनेक नेत्यांनी साथ सोडली, आणि आता शरद पवारांचे निकटवर्तीय आणि विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी राजकारणातून हळूहळू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
८५ वर्षीय गुजराथी हे शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात, पण त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी अजित पवार गटाकडे कललेली असल्याने त्यांना पक्ष सोडण्याची वेळ आली आहे. या घटनेने शरद पवार गटाला खानदेशात मोठा हादरा बसला आहे, आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला सतत धक्के बसत आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर विधानसभा निवडणुकीतही पक्षाला मोठा फटका बसला, ज्यामुळे अनेक माजी मंत्री, आमदार आणि नेत्यांनी पक्ष सोडला. यात जळगाव ग्रामीण, भुसावळ आणि इतर मतदारसंघातील नेते सामील झाले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाने खानदेशात जोरदार तयारी सुरू केली असली, तरी गळती थांबली नाही. ११ सप्टेंबरला जळगाव जिल्ह्यात झालेल्या महत्वाच्या बैठकीत शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक नेते उपस्थित होते, पण गुजराथी यांची अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तेव्हापासूनच ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली होती.
अरुणभाई गुजराथी (८५) हे शरद पवारांचे दीर्घकाळाचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी विधानसभेचे सभापती म्हणून महत्वाची भूमिका बजावली असून, पक्षाच्या विस्तारात मोठा वाटा उचलला आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठकेच्या वेळीच चर्चा सुरू झाल्या की, ते भाजप किंवा अजित पवार गटात जाणार. मात्र, गुजराथी यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते राजकारणातून हळूहळू बाहेर पडणार आहेत.
त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “मी सर्व बैठकांमध्ये चांगल्या पद्धतीने उपस्थित राहायचो. काल मी उपस्थित नव्हतो ही वस्तुस्थिती आहे. त्यातून काही लोकांनी मी भाजप किंवा अजितदादा गटात जाणार असल्याची चर्चा केली. मी आता हळहळू राजकारणातून निवृत्त होणार आहे. माझे वय ८५ वर्षे झाले आहे. मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही किंवा नियुक्तीने कोणतीही जागा मिळवायची नाही. शरद पवारांनी मला खूप मोठे केले. मी माझ्या नेत्याला कसं सोडणार, त्यांच्या बद्दलची कृतज्ञता कायम राहील.”
गुजराथी यांनी पुढे सांगितले, “माझ्याकडील कार्यकर्त्यांची फळी अजित पवार गटात जाण्याकडे कल आहे. त्या दृष्टीने त्यांना काही निर्णय घ्यायचे आहेत. त्यांना आता जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका लढवायच्या आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांचा उत्तराई म्हणून त्यांचे काम मला करावे लागेल. कार्यकर्त्यांना मी सोडू शकत नाही, हे देखील सत्य आहे. या निवडणुकांनंतर मी स्वतः राजकारणापासून अलीप्त होऊन जाईन.” यामुळे गुजराथी यांचे कार्यकर्ते अजित गटात जाण्याची शक्यता बळावली असून, शरद पवार गटाला खानदेशात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.


