Nashik School Bomb Threat: नाशिकमधील इंदिरा नगर परिसरातील केंब्रिज शाळेला सोमवारी बॉम्बची धमकी देणारा ई-मेल पाठवण्यात आला. या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली. मेलची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून शाळेच्या आवारात बोलावले. पालकांना तातडीने शाळेत बोलावून मुलांना सुरक्षितपणे घरी नेण्यास सांगितले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांची तातडीची कारवाई
इंदिरा नगर पोलिसांना माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि निकामी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण शाळा परिसराची तपासणी केली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. या ई-मेलमागे कोणाचा खोडसाळपणा आहे की अन्य काही हेतू, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, दुपारी जवळपास दीड तास शाळेच्या परिसरात तणाव आणि दहशतीचे वातावरण होते. अखेर तपासानंतर हा इशारा अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
इस्कॉन मंदिराला अशीच अफवा
गेल्या महिन्यात 22 ऑगस्ट रोजी मुंबईतील गिरगाव येथील इस्कॉन मंदिरालाही बॉम्बची धमकी देणारा ई-मेल मिळाला होता. तातडीने पोलिसांनी कारवाई करत बीडीडीएस पथकाला घटनास्थळी बोलावले. रात्री उशिरापर्यंत परिसराची तपासणी झाली पण कोणतेही स्फोटके आढळली नाहीत. ही धमकीही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.


