दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील नामवंत वकील सिद्धार्थ शिंदे (वय 48) यांचे काल (15 सप्टेंबर 2025) रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू असलेले सिद्धार्थ शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयात काम सुरू असताना अचानक चक्कर आली. त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिंदे यांना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि संविधानाचे सखोल ज्ञान होते. कायद्याचे बारकावे ते अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडत असत. मूळचे श्रीरामपूरचे असलेले शिंदे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात स्थायिक आहे. सिद्धार्थ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
सोमवारी नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामकाजासाठी गेले असता त्यांना अस्वस्थ वाटू लागले. रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांना वाचवता आले नाही. त्यांच्या निधनाने कायदा क्षेत्रात शोककळा पसरली असून, त्यांच्या साध्या-सोप्या कायदेशीर विश्लेषणाने प्रभावित झालेल्या सहकाऱ्यांनी आणि चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
त्यांचे पार्थिव आज (मंगळवार, 16 सप्टेंबर 2025) सकाळी पुण्यातील निवासस्थानी आणले जाणार असून, दुपारी 1 वाजता रविवार पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.


