डेहरादून : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे डेहरादून आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला. सहस्रधारा जवळील कार्लीगडमध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, मालदेवता परिसरातील नदी ओसंडून वाहू लागल्याने रस्ते, बंधारे आणि पूल पूर्णपणे कोसळले. रिस्पना आणि बिंदल नद्यांच्या पाण्याने अनेक वसाहती जलमय झाल्या असून घरांमध्ये कचरा आणि चिखल शिरला आहे. दुकाने, हॉटेल्सही पाण्याच्या तडाख्याने वाहून गेली.
दरम्यान, मसूरी-देहरादून रस्ता आणि देहरादून-पावंटा राष्ट्रीय महामार्ग भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी बंद झाला आहे. प्रेमनगर नंदा की चौकीजवळ पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तथापी, आसन नदीत ट्रॅक्टर ट्रॉली कोसळून 15 जण बेपत्ता झाले असून, आतापर्यंत दोन मृतदेह सापडले आहेत. तसेच, कलसी-चक्राटा रोडवरील दगड कोसळल्याने पंजाबमधील एका तरुणाचा मृत्यू झाला. मसूरीतील झाडीपाणी-राजपूर पदपथाजवळ झालेल्या भूस्खलनात दोन जण गाडले गेले, त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला.
तपकेश्वर महादेव मंदिर परिसरात साचले पाणी
याशिवाय, देवभूमी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात आले. तपकेश्वर महादेव मंदिर परिसरात पाणी साचल्याने रेलिंग आणि पाण्याची टाकी वाहून गेली. दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आपत्तीग्रस्त भागांची पाहणी करून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले की, राज्य सरकार प्रत्येक बाधित कुटुंबाच्या पाठीशी उभे आहे. प्रशासन तसेच एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.


