Pune Income Tax Raid: पुणे शहरात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमधील कार्यालयावर तसेच सिंध सोसायटीतील निवासस्थानी छापे टाकण्यात आले. याशिवाय मित्तल ग्रुपच्या बंडगार्डन भागातील कार्यालयावरही धाड घालण्यात आली. या कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या तपासामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुंबईतील ऑनेस्ट शेल्टर्स एलएलपी प्रकल्पाच्या संदर्भात मित्तल ब्रदर्स ग्रुपची ईडीने यापूर्वी चौकशी केली होती. महारेराच्या आदेशानंतर ही कारवाई केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वरळी येथील पॅलेस रॉयल प्रकल्पातील फ्लॅट्स वेळेत न दिल्याबाबत कंपनीवर 90 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने केलेल्या धडक कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिला सुरक्षा रक्षकावर लैंगिक अत्याचार-
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. मिलेनियम मॉलमध्ये एका महिला सुरक्षा रक्षकावर तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. पीडित महिला तिच्या पतीसह एका खासगी सुरक्षा कंपनीत काम करते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज धोंडीराम कदम (वय 45) यांनी महिलेवर जबरदस्ती करून तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील कृती केली. महिलेने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण केली आणि अत्याचार सुरूच ठेवले. या प्रकरणी वाकड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 74, 351(2), 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


