Gajanan Mehendale: पुण्यातील इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातील नामवंत आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गजानन मेहेंदळे यांनी गेल्या 50 वर्षांपासून इतिहास संशोधनाला समर्पित जीवन जगले. त्यांनी शिवचरित्र, मुघलकालीन दस्तऐवज, युद्ध इतिहास आणि धार्मिक धोरणांवर सखोल अभ्यास करून अनेक ग्रंथ आणि शोधनिबंध लिहिले. त्यांच्या मराठी, इंग्रजी, फारसी, उर्दू आणि युरोपीय भाषांवरील प्रभुत्वामुळे त्यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली होती.
मेहेंदळे यांनी ‘श्री राजा शिवछत्रपती’ (खंड 1 व 2), ‘Shivaji: His Life and Times’, ‘इस्लामची ओळख’, ‘आदिलशाही फर्माने’, ‘Tipu as He Really Was’ आणि ‘शिवछत्रपतींचे आरमार’ यांसारखी महत्त्वाची पुस्तके लिहिली. त्यांचे ग्रंथ आज विविध विद्यापीठे आणि इतिहास अभ्यासक्रमांमध्ये संदर्भग्रंथ म्हणून वापरले जातात.
मेहेंदळे यांचे कारकिर्दीतील उल्लेखनीय टप्पे –
वयाच्या 24 व्या वर्षी त्यांना बांगलादेशमध्ये युद्ध सुरू होण्याच्या आधी पाठवण्यात आले होते. त्यांनी सुरुवातीला ‘तरुण भारत’मध्ये पत्रकार म्हणून काम केले. सध्या ते इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयांवर संशोधन करत होते. गजानन मेहेंदळे हे क्रियाशील संशोधक होते.
त्यांचे पार्थिव आज सकाळी 11 वाजता भारत इतिहास संशोधक मंडळात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गजानन मेहेंदळे यांचे योगदान इतिहास क्षेत्रात अमूल्य मानले जाते. त्यांच्या मृत्यूनंतर संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


