मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना आता e-KYC करणे बंधनकारक असून, येत्या दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी e-KYC आवश्यक आहे. “https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध आहे.
ही प्रक्रिया सोपी आणि सुलभ आहे. सर्व लाभार्थ्यांनी दोन महिन्यांत e-KYC पूर्ण करावे,” असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय, ही प्रक्रिया भविष्यातील शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. विरोधकांनी या योजनेमुळे राज्याच्या कर्जाचा बोजा वाढत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक जाचक अटी लादत असल्याचा दावाही विरोधकांनी केला आहे.


