मुंबई: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि पूरामुळे झालेल्या नुकसानीमुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा उपाय म्हणून आपला एक महिन्याचा पगार देण्याचे निर्णय घेतले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद सदस्य आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश पूरग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत करणे आहे. संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे आहे, असे तटकरे यांनी सांगितले.
याआधीच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपला पगार पूरग्रस्तांसाठी देण्याची घोषणा केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्व आमदार, खासदारांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. अजित पवार स्वतः सोलापूर, धाराशीव आणि बीड जिल्ह्यांना भेट देत आहेत, पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाला तातडीने मदत देण्याचे निर्देश देत आहेत.
याचबरोबर शिवसेना पक्षाचे मंत्री, आमदार आणि खासदारही आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यामुळे महायुतीतील दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे पूरग्रस्तांसाठी पगार दान करण्याचा ठराव केला आहे. दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ देण्याचे काम सुरू झाले असून आतापर्यंत 2654 कुटुंबांना मदत पुरवली गेली आहे. साडेसव्वीस मेट्रिक टन गहू-तांदूळ वाटप केले गेले आहे.
भुजबळ म्हणाले की, संकट मोठे आहे, त्यामुळे मदतीची वाट न बघता सरकार पुढे येत आहे. पाऊस आणि ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे लोकांना मोठा त्रास होत असून, भविष्यातील टाऊन प्लॅनिंगमध्ये याचा विचार करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.


