Pak Asia Cup Final : दुबईत 28 सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने नवव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. देशभरात जल्लोष सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत संघाचे कौतुक केले, “मैदानातही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच, भारताचा विजय!” केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विट करत म्हटले, “अद्भुत विजय! आमच्या खेळाडूंनी प्रचंड उर्जेने पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. भारत जिंकणारच, मग मैदान कोणतेही असो!”
#OperationSindoor on the games field.
Outcome is the same – India wins!
Congrats to our cricketers.
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2025
भारत-पाक सामना कसा रंगला?
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली. साहिबजादा फरहानने 57 (38) धावांची खणखणीत खेळी केली, पण त्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी ढासळली. फखर जमन (46) आणि सैम अयूब (14) वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. तीन फलंदाज शून्यावर बाद झाले, तर कर्णधार सलमान अली आगा (8), हुसैन तलत (1), मोहम्मद नवाज (6) आणि हारिस रऊफ (6) स्वस्तात माघारी परतले. परिणामी, पाकिस्तानचा डाव 146 धावांवर आटोपला.
147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळली. अभिषेक शर्मा दुसऱ्या षटकातच बाद झाला, तर शुभमन गिल (12) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (1) लवकर माघारी परतले. संजू सॅमसन (24) आणि तिलक वर्माने अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. त्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी आणखी एक अर्धशतकी भागीदारी रचली. शेवटच्या दोन षटकांत 17 धावांची गरज होती, तर अंतिम षटकात 10 धावा हव्या होत्या. रिंकू सिंगने विजयी शॉट मारत भारताला विजय मिळवून दिला. तिलक वर्माने 53 चेंडूत नाबाद 69 धावा (3 चौकार, 4 षटकार) करत सामन्याचा शिलेदार ठरला.
ट्रॉफीशिवाय भारतीय खेळाडूंनी विजयोत्सव साजरा
आशिया चषकाचा अंतिम सामना तितकाच नाट्यमय ठरला जितका पारितोषिक वितरण सोहळा. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट कौन्सिलचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते विजेतेपदाची ट्रॉफी आणि वैयक्तिक पुरस्कार स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. समालोचक सायमन डूल यांनी एसीसीच्या सूचनेनुसार हा सोहळा थोडक्यात आटोपला.
भारतीय खेळाडूंनी कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या वैयक्तिक पुरस्कारांसाठी इतर मान्यवरांचा पर्याय निवडला, पण मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. याउलट, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने उपविजेतेपदाचा धनादेश नक्वी यांच्याकडून स्वीकारला. भारतीय संघाच्या या भूमिकेमुळे सोहळ्यात नक्वींचा चेहरा उतरलेला दिसला. तरीही, ट्रॉफीशिवाय भारतीय खेळाडूंनी विजयोत्सव साजरा केला.


