पुणे : वडगाव शेरी येथील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांना काही दिवसांपूर्वी मारहाण झाल्याची घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांसोबत झालेल्या या वादातून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाली होती. मात्र त्यांच्या पुतण्याला मारहाण झाल्याचे पाठारे यांनी सांगितले. या प्रकरणी बंडू खांदवे सह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी संध्याकाळी लोहगाव परिसरात एका कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमावेळी दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद रंगला. आमदार बापू पठारे आणि अजित पवारांचे समर्थक बंडू खांदवे यांच्यातील शाब्दिक वादाचे पडसाद हाणामारीत झाले. वाद चिघळल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रस्त्याच्या कामावरून हा वाद उफाळून आला.
मारहाण झाल्याचा बंडू खांदवेंचा आरोप
8 डिसेंबर 2023 रोजी संबंधित रोडसाठी 31 कोटी मंजूर झाले होते. परंतु रस्त्याचे काम सुरू नव्हते. रस्त्यावर पाण्याच्या लाईन, ड्रेनेजच्या लाईन नव्हत्या मग रस्ता कसा करायचा होता असा सवाल आमदार बापू पठारे यांनी केला. 5 वर्ष सत्तेत असताना तुम्हाला कुणी अडवले होते. आता चुकीची यादी दाखवून लोकांची दिशाभूल केली जाते. माझ्याबरोबर खोटे राजकारण करू नका, जनता माफ करणार नाही असं आमदारांनी म्हटलं तर आमचे आंदोलन प्रशासनाविरोधात होते. आमदारांनी स्वत: हा विषय स्वत:वर ओढावून घेतला. झटापटीत आमदारांच्या सुरक्षा रक्षकांनी माझा शर्ट फाडला, मलाही मारहाण केली असा आरोप बंडू खांदवे यांनी केला आहे.
जनता त्यांना धडा शिकवेल
आम्ही राजकीय जीवनात कधीच ड्रेनेज, पाणी पाइपलाइन न टाकता रस्ते केले नाहीत. रस्त्याच्या कामांना उशीर झाला म्हणून आम्हाला काहीतरी टार्गेट करायचं आणि सुनियोजित हल्ला करून मीडियाला खोट्या प्रतिक्रिया त्यांनीच द्यायच्या. गावातील काही लोक बोलावून काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. चालक शकील शेख हे खासगी रुग्णालयात भरती असल्याने त्यांचा जबाब रात्री होऊ शकला नाही; परंतु शासकीय कर्मचारी म्हणून तक्रार दाखल केली आहे. पुतण्या सचिन पठारे यालाही मारहाण केली गेली.


