पुणे: राजकीय नेत्यांकडे नागरिक आपापल्या तक्रारी, अडचणी घेऊन येतात हे काही नवीन नाही. मात्र कधी कधी या तक्रारींचा विषयच एवढा अनोखा असतो की नेत्यांनाही हसू आवरता येत नाही. अशीच एक मजेशीर घटना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुणे दौऱ्यात घडली. आज पुण्यातील दौऱ्यात सुळे यांच्या अनेक बैठकांदरम्यान आणि कार्यक्रमांदरम्यान एक ज्येष्ठ नागरिक म्हणजेच एक पुणेरी आजीबाई थेट त्यांच्याजवळ आल्या. धावत येऊन त्यांनी खासदार सुळे यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरला. सुळे यांनीही हसून त्यांना विचारले, काय झालं आजी? त्यावर आजीबाईंनी हळहळ व्यक्त केली की, आम्ही पैसे देऊन केबल कनेक्शन घेतो, पण टीव्हीवर कार्यक्रम दहा मिनिटे दाखवतात आणि वीस मिनिटे जाहिराती दाखवतात. मग आम्ही नेमकं काय पाहायचं? असा प्रश्न त्यांनी खासदार सुळे यांच्यासमोर मांडला.
आजींनी सांगितलं की, याबद्दल तक्रार कुठे करावी हेच कळत नाही. योगायोगाने तुम्ही इथे आलात म्हणून तुमच्याकडे सांगतेय. या जाहिरातींमुळे आमचा वेळ वाया जातो, आणि आता आम्हाला त्यांचा प्रचंड कंटाळा आला आहे. सुप्रिया सुळे या आजीबाईंचं म्हणणं ऐकून क्षणभर हसल्या, पण आजीबाई थांबल्या नाहीत. त्या म्हणाल्या, पंधरा मिनिटांचा कार्यक्रम असतो. पण त्यात सगळ्या जाहिरातींचं चालू असतात.
हेही वाचा – गौतमी पाटीलला मोठा दिलासा! अपघात प्रकरणात पुणे पोलिसांकडून ‘क्लीन चीट’
दरम्यान, यावर सुळे यांनी विनोदी शैलीत विचारलं, ‘अहो 22 मिनिटांचा एपिसोड असतो ना?’ त्यावर आजीबाईंनी ठाम उत्तर दिलं, ‘नाही ग, थोडंसंच दाखवतात ते! कृपा करून तुम्ही काहीतरी करा.’ सुळे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून होकार देत सांगितले, ‘नक्की काहीतरी पाहते, आजी.’ या संवादादरम्यान आजूबाजूचे लोकसुद्धा हसत होते. त्यामुळे सध्या पुणे दौऱ्यात भेटलेल्या आजीची अनोखी तक्रार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.


