Pune Crime: परदेशात फरार झालेल्या पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांमधील संबंधांचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. गुरुवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि शिंदे गटातील नेते राम शिंदे, योगेश कदम, तानाजी सावंत आणि संतोष बांगर यांच्यावर थेट निशाणा साधला.
घायवळला पळून जाण्यासाठी मदत -रोहित पवार
रोहित पवार यांनी असा दावा केला की, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे हे निलेश घायवळचे निकटवर्तीय आहेत आणि त्यांनीच त्याला परदेशात पलायन करण्यास मदत केली. त्यांनी पुढे म्हटलं की, राम शिंदे यांनी या संदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी फोनवर चर्चा केली असावी किंवा त्यांच्यावर गृह खात्यातून दबाव आणला गेला असावा. पवार यांनी पुढे उघड केलं की, निलेश घायवळच्या भावाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही बंदुकीचा परवाना देण्यात आला. सामान्य व्यापाऱ्यांना परवाना मिळवण्यासाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागते, पण गुंडांच्या नात्यांना सहज परवाने दिले जातात. यामध्ये वरिष्ठ पातळीवरील हस्तक्षेप दिसतो, असा आरोप त्यांनी केला.
खोट्या नावाने पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन
रोहित पवार यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या निलेश घायवळला खोट्या नावाने पासपोर्ट जारी करण्यात आला आणि त्यानंतर तो अहमदाबाद विमानतळावरून लंडनला रवाना झाला. या संपूर्ण प्रकरणात राम शिंदे आणि धाराशिवमधील एका नेत्याचा सहभाग असल्याचा संशय आहे.
पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी भाजप सरकारवरही जोरदार टीका केली. हे सरकार गुंडांना आणि कंत्राटदारांना संरक्षण देतं. निलेश घायवळसारखे गुंड नेत्यांच्या प्रचारात खुलेआम दिसतात. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील समीर पाटील याचे घायवळशी निकटचे संबंध आहेत, असा दावा त्यांनी करत संबंधितांचे फोटो आणि संभाषणाच्या क्लिप्स उपलब्ध असल्याचं सांगितलं.
तानाजी सावंत आणि संतोष बांगरवरही आरोप
या प्रकरणात रोहित पवार यांनी तानाजी सावंत आणि संतोष बांगर यांच्याही नावांचा उल्लेख केला. हे दोघे निलेश घायवळला अधिवेशनात सहज प्रवेश मिळवून देतात. अशा गुंडांना विधिमंडळाच्या आवारात येण्याची परवानगी कशी मिळते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, सावंत यांच्या कुटुंबीयांचा शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्याच्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला. रोहित पवार यांनी शेवटी म्हटलं, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीच्या बाबतीत पुणे शहर राज्यात एक नंबरला गेलं आहे. यामागे सत्ताधारी नेत्यांचा आशीर्वाद आहे.


