MSEDCL Strike In Pune: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) च्या ६२ टक्के कर्मचाऱ्यांनी आजपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी संपात सहभाग घेतल्याने पुण्यातील वीजपुरवठा सेवांवर आंशिक परिणाम झाला आहे. सरकारने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (मेस्मा) लागू करून संप बेकायदेशीर ठरवला असतानाही कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्धार कायम ठेवला आहे. संपात सहभागी कर्मचारी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या वेतनश्रेणी सुधारणा, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, तसेच पेन्शन लाभांमध्ये सुधारणा या प्रमुख मागण्यांवर ठाम आहेत.
महावितरणने सांगितले की सध्या रुग्णालये, पाणीपुरवठा प्रकल्प आणि इतर अत्यावश्यक सेवांवरील वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सक्रिय करण्यात आले असून, तांत्रिक कर्मचारी रोटेशनल पद्धतीने तैनात करण्यात आले आहेत. महत्त्वाच्या सेवांवर परिणाम होऊ नये म्हणून सर्व पातळीवर देखरेख वाढवण्यात आली आहे, असे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा – पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदाची दिवाळी होणार गोड; सानुग्रह अनुदानात वाढ
दरम्यान, प्रशासनाने सांगितले की, नवीन कनेक्शन, मीटर तपासणी आणि बिलिंग सेवांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. उपनगरीय भागांतून आधीच बिघाड दुरुस्ती आणि बिलिंग त्रुटींबाबतच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. दरम्यान, पुणे सर्कलमधील शेकडो कर्मचाऱ्यांनी आज विभागीय कार्यालयांबाहेर धरणे आंदोलन केले. त्यांनी ‘अपूर्ण आश्वासनं स्वीकारार्ह नाहीत’ अशा घोषणांसह व्यवस्थापनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
राज्य ऊर्जा विभागाने या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी संवाद सुरू असल्याचे सांगितले. तथापी, सार्वजनिक हित लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी कामावर परतावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. मात्र, युनियन नेत्यांनी स्पष्ट केले की, सरकारकडून लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील.


