Karjat Block: मध्य रेल्वेच्या कर्जत-नेरळ मार्गावर महत्त्वाचे काम सुरू असल्याने १२ ऑक्टोबरपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. कर्जत यार्ड पुनर्रचना आणि प्री-नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येत असून, यामुळे मुंबई–पुणे आणि सोलापूरमार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या सेवांवर मोठा परिणाम होणार आहे.
कोणत्या सेवांवर परिणाम होणार?
११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवसांमध्ये मध्य रेल्वेने मुंबई–पुणे मार्गावरील सर्व इंटरसिटी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात
- प्रगती एक्स्प्रेस
- डेक्कन क्वीन
- इंद्रायणी एक्स्प्रेस
- डेक्कन एक्स्प्रेस
- इंटरसिटी एक्स्प्रेस
- सिंहगड एक्स्प्रेस (रविवारची सेवा)
या सर्व गाड्या रद्द राहतील.
तथापी, मुंबई–सोलापूर मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस (मुंबई–सोलापूर–मुंबई) ही सेवा १२ ऑक्टोबर रोजी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. सिद्धेश्वर एक्स्प्रेस त्या दिवशी मुंबईपर्यंत न जाता फक्त पुण्यापर्यंतच धावणार आहे.
लोकल सेवांवर परिणाम
कर्जत–नेरळ आणि कर्जत–खोपोली या मार्गावरील सर्व लोकल सेवा ११ आणि १२ ऑक्टोबरला पूर्णपणे बंद राहतील. तथापि, नेरळ ते CSMT दरम्यानची लोकल सेवा सुरू राहील. या ब्लॉकनंतरही १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते दुपारी २.२० या वेळेत पुन्हा तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हेही वाचा – …तर मुंबई, ठाण्यासह पुणेही जाम करू; नागपूरमध्ये ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा
लोकल वेळापत्रकातील बदल:
- ११ ऑक्टोबर रोजी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल : कर्जत ते CSMT – सकाळी ११:१९
- १२ ऑक्टोबर रोजी ब्लॉकनंतरची पहिली लोकल : कर्जत ते CSMT – संध्याकाळी ७:४३
प्रवाशांना सूचना
या मेगा ब्लॉकदरम्यान मुंबई–पुणे मार्गावरील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत राहणार असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. यामुळे सणासुदीपूर्वी प्रवास करणाऱ्या आणि खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी प्रवास व्यवस्था करण्याचा सल्ला दिला आहे.


