Satara Yashwant Bank Scam : फलटण येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत ११२ कोटी १० लाख ५७ हजार रुपयांचा प्रचंड आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी शनिवारी रात्री कराड शहर पोलीस ठाण्यात ५० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, यात भाजप नेते आणि बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर तसेच फलटणचे माजी आमदार स्व. कृष्णचंद्र भोईटे यांचे पुत्र नरेंद्र भोईटे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. या घोटाळ्याने सातारा जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक खळबळ उडाली आहे.
पुण्यातील शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, बँकेच्या अध्यक्ष, संचालक आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांचा अपहार केला. एप्रिल २०१८ ते मार्च २०२४ या कालावधीतील तसेच एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या लेखापरीक्षणात हा गैरप्रकार उघड झाला. बँकेच्या निधीचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी बोगस कर्जांचे वाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
कोणावर गुन्हा दाखल?
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर (भाजप नेते), संचालक नरेंद्र भोईटे, रवींद्र टोणपे, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, सुनील पावसकर, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी, अवधूत नाटेकर, डॉ. नचिकेत वाचासुंदर, चंद्रकांत कुलकर्णी, गणपतराव निकम, नानासो पवार, पांडुरंग करपे, नितीन रेडेकर, स्नेहन कुलकर्णी, कल्पना गुणे, लक्ष्मण सपाटे, महेशकुमार जाधव, अजित निकम, नानासाहेब पवार, गोपीनाथ कुलकर्णी, संदीप इंगळे, जयवंत जगदाळे, डॉ. प्रदीपकुमार शिंदे, प्रसाद देशपांडे, सुहास हिरेमठ, परशुराम जंगाणी, अनघा कुलकर्णी, विशाल शेजवळ, प्रमोद गिजरे, वसंतराव बोराटे, सुनील मुंद्रावळे, नीलिमा कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, सचिन साळुंखे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, धनंजय डोईफोडे, वैशाली मोकाशी, शाखा व्यवस्थापक वैशाली पावशे, केशव कुलकर्णी, शेखर चरेगावकरांचे भाऊ शार्दूल उर्फ मुकुंद चरेगावकर, विठ्ठल उर्फ शौनक कुलकर्णी, राही कुलकर्णी, संहिता कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, काशिनाथ कुलकर्णी, सूरज गायधनी, विभिषण सोनावणे आणि दिनेश नवळे यांचा समावेश आहे.
- ११२ कोटी १० लाख रुपयांचा अपहार करण्यासाठी १९५ बनावट कर्ज खाती उघडली गेली.
- कर्ज देण्यासाठी कोणतेही तारण न घेता हेतुपुरस्सर वाटप, जुन्या थकबाकी खात्यांना बंद दाखवून नवीन खाती उघडली.
- खोट्या नोंदी आणि फेरफार करून बँकेच्या निधीचा गैरवापर.
- संचालक आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर संगनमताने बँकेचे आर्थिक नुकसान केले आणि वैयक्तिक संपत्ती वाढवली.
या घोटाळ्यामुळे खातेदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. रिझर्व्ह बँकेने बँकेवर प्रशासक नेमला असून, पुढील तपास सुरू आहे. सातारा आणि फलटणमध्ये खातेदारांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे, तर भाजप नेत्यांवरील आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. हा घोटाळा सहकारी बँकिंग क्षेत्रातील अनियमिततांचे गंभीर उदाहरण ठरला आहे.


