Kolhapur Hostel Authority Statement : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कात्यायनी परिसरातील शासकीय महिला वसतिगृहात अश्लील नृत्य आणि वेश्याव्यवसायाच्या आरोपांतर्गत परिनिरीक्षणात असलेल्या सहा महिलांनी शुक्रवारी सकाळी हाताच्या नस कापून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. यानंतर वसतिगृह कर्मचाऱ्यांनी तातडीने महिलांना छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्वांच्या प्रकृती स्थिर असून, त्यांना मानसोपचार विभागात ठेवण्यात आले आहे.
वसतिगृह निरीक्षकांच्या माहितीनुसार, सकाळी एका महिलेने मनगटाला कापले असल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी खोली तपासली. तेव्हा सर्व सहा महिला रक्ताळलेल्या अवस्थेत आढळल्या. तात्काळ वरिष्ठांना कळवून रुग्णवाहिकेद्वारे सीपीआर रुग्णालयात नेले गेले. तिथे अपघात विभागात प्राथमिक उपचारानंतर त्यांना मानसिक आरोग्य विभागात हलवण्यात आले.
वसतिगृह परिवेक्षण अधिकारी पी. एन. थोरात यांनी सांगितले की, “महिलांना वेश्याव्यवसायापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन, प्रशिक्षण आणि वर्षभराचे पुनर्वसन कार्यक्रम चालू आहेत. न्यायालयीन आदेशानुसार त्यांची राहणीमानाची उत्तम व्यवस्था आहे. मात्र, या अचानक घेतलेल्या पावलाने सर्वांनाच धक्का बसला आहे.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० ऑगस्ट रोजी कळंब्याजवळील स्वप्नहिल फार्महाउसवर पोलिसांनी छापा टाकताना घडली होती. रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या कारवाईत अश्लील नृत्याच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे उघड झाले. या छाप्यात सहा महिलांसह मुख्य एजंट फातिमा विजय देसाई (३३, रा. मार्केट यार्ड), राहुल सुरेश लोहार (३३, रा. पेठवडगाव), अजय पाटील, परशुराम चवंडू पाटील (४५, रा. मनतवाडी, चंदगड), विनोद माळकरी, पप्पू चव्हाण आणि फार्महाउस मालक संदीप अनिलराव कदम (कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
या महिलांना न्यायालयात हजर केल्यानंतर पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले. वेश्याव्यवसायापासून दूर करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोजगार संधी, वर्तन सुधारणा आणि कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे. दरम्यान, कुटुंबियांकडूनही त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत


