धाराशिव : जिल्ह्यात उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर लोकनाट्य कला केंद्रांवरील प्रशासनाचा कारवाईचा धडाका सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी कालिका आणि गौरी या लोकनाट्य कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.
यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील चार केंद्रांवर कारवाई झाली असून, तुळजाई, पिंजरा, साई आणि कालिका या केंद्रांचे परवाने रद्द झाले आहेत. सोलापूर-धुळे महामार्गालगत असलेल्या या केंद्रांनी प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पोलिसांनी मध्यरात्री बाराच्या सुमारास मोठी कारवाई केली. यामध्ये धाराशिव तालुक्यातील आळणी येथील साई आणि पिंजरा या कला केंद्रांवर तर चोराखळी पाटी येथील गौरी, कालिका आणि महाकालिका या केंद्रांवर छापे टाकण्यात आले.
या केंद्रांवर कला केंद्रांच्या नावाखाली बेकायदेशीर प्रकार चालवले जात असल्याचा संशय होता. यापूर्वी वाशी तालुक्यातील तुळजाई लोकनाट्य कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील इतर केंद्रचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ (नवीन भारतीय न्याय संहिता कलम २२३) अंतर्गत गुन्हे दाखल केले असून, पुढील चौकशी सुरू आहे. जिल्ह्यातील पाच कला केंद्रांवर एकूण गुन्हे दाखल झाले आहेत. ही कारवाई वाढत्या गुन्हेगारी आणि नियमभंगाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून, लोकनाट्य कला केंद्रांना परवानगी देण्यात आलेल्या अटींचे काटेकोरपणे पालन न केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.


