Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या ठाकरे बंधूंवरील टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. शेलार यांनी शिवाजी पार्कपासून टिळक भवनापर्यंतच्या प्रवासात ठाकरे बंधूंचा हिंदुत्वाचा रंग “जिरला” असल्याचा टोला लगावला होता. यावर राऊतांनी, “राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊ नका, उगाच नाटक करायला जाऊ नका. ठाकरे बंधूंचा रंग पक्का आहे, तो खरवडून काढण्याचा प्रयत्न करू नये,” असा इशारा दिला.
भाजपकडे स्वत:चं काय? राऊतांचा सवाल
राऊतांनी भाजपवर टीका करताना त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “भाजपचा रंग भ्रष्टाचाराचा आहे, काँग्रेसचा आहे. त्यांच्यात 90 टक्के नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले आहेत. भाजपकडे स्वत:चं नेतृत्व आहे का? स्वत:ची पोरं जन्माला घाला, दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार?” असा खोचक टोला राऊतांनी लगावला.
त्यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाच्या बातम्यांचा उल्लेख करत, “कालपर्यंत हे सगळे आमच्या छत्राखाली होते. कर्डिले यांचं आयुष्य काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही काळ शिवसेनेत गेलं. तरीही त्यांना भाजप नेते म्हणून ओळखलं गेलं. भाजपमधील 90 टक्के नेते हे शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून आलेले आहेत,” असा दावा संजय राऊत यांनी केला.
ठाकरे बंधू एकत्र काम करतील
राऊतांनी पुढे सांगितलं की, राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र राहण्यासाठी आणि एकत्र काम करण्यासाठी एकत्र आले आहेत. “त्यांचा रंग पक्का आहे, तो कोणीही खरवडू शकत नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राऊतांच्या या प्रत्युत्तराने ठाकरे बंधू आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे.


