सोलापूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे वारंवार विध्वंसक बोलतात. त्यांचे वक्तव्य डायव्हर्ट करण्यात भाजपा वस्ताद आहे, असा टोला लगावताना भारतीय जनता पार्टी सध्या दाखवत असलेले संविधान प्रेम हे फेक आहे. जोपर्यंत अमित शहा माफी मागत नाही आणि राजीनामा देत नाही. तोपर्यंत आम्ही हा विषय लावून धरणार आहे, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कालपर्यंत संविधानाचा अपमान करणाऱ्यांना आता संविधानाचा पुळका आला आहे. ‘भाजपा’चे हे संविधान प्रेम एकदम फेक आहे. ‘चार सौ पार’चा नारा देणाऱ्या ‘भाजपा’ला जनतेने २०० वरच गार केले. तरी ते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये दम नाही त्यांनी हे लक्षात ठेवावे की सोलापूरची खासदार काँग्रेसची आहे, असे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.
यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला अमित शहा यांच्या वक्तव्याचे व्हिडिओ चित्रण दाखविण्यात आले. काँग्रेसने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असा त्यांचा आरोप आहे. आता तुम्हीच सांगा, आम्ही त्यांच्या वक्तव्याचा कुठे विपर्यास केला? असा प्रति प्रश्नही खासदार शिंदे यांनी केला. दरम्यान, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.
हे तर सोलापूरचे दुर्दैव
सोलापूर जिल्ह्याचे पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे असतानाही मंत्रीपद मिळाले नाही यावर बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, हे सोलापूरचे दुर्दैव म्हणावं लागेल. भाजपाच्या नेतृत्व सक्षम नसल्याचे यावरून सिध्द होते. सोलापूरच्या भाजप नेत्यांमध्ये ‘मी भारी का तू भारी’ यामध्येच भांडणे असतात, हे नेतृत्व जाणून आहे. म्हणूनच सोलापूर मंत्री पदापासून दूर असल्याची टीका केली.


