सोलापूर: मागील भांडणाचा राग अनावर होऊन एकाच्या डोक्यात लाकडाने प्रहार करत मारहाण करण्यात आल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड येथे रविवार, २२ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात मार खाणारा जागीच बेशुध्द झाला. मुरली हरी काळे (वय-४२) असे बेशुध्द झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मुरली काळे आणि शंकर अशोक चव्हाण यांच्यात यापुर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन शंकर चव्हाण याने रविवारी सकाळी मुरली काळे यांना गावातील भर रस्त्यात लाकडी वस्तूने डोक्यात जोरदार दणका दिला. या मारामारीत दोघेही जमिनीवर कोसळले. ही घटना गावातील व्यक्तींनी १०८ या नंबरला कळविली. त्यानुसार काही वेळातच गावात अॅम्ब्युलन्स आणि पोलीस पथक दाखल झाले. मुरली काळे यांना उपचाराकरता नेत असताना ग्रामस्थांनी मदत केली नसल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज अभंग याबाबत बोलताना म्हणाले, यातील दोघांमध्ये घर जागेच्या कारणावरून गेल्या अनेक दिवसापासून भांडण होते. रागाच्या भरात डोक्यात मोठा प्रहार झाल्याने मुरली काळे जागेवर बेशुध्द झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यातील आरोपी शंकर चव्हाण यास ताब्यात घेण्यात आले.


