नाशिक : राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर निर्माण झालेला खाते वाटपाचा तिढा सुटत नाही तोच आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहे. खातेवाटप जाहीर केल्यानंतर मंत्र्यांना पालकमंत्री पदावर दावा सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी नाशिकचा पालकमंत्री आमचाच राहणार, असा दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीमुळे भाजप व राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून जुंपण्याची शक्यता आहे.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अॅड. कोकाटे यांचे रविवारी (दि. २२) नाशिकमध्ये आगमन झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला. ते म्हणाले, जिल्ह्यात महायुतीच्या १४ पैकी ७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद आमच्याच पक्षाला मिळावे, अशी आम्ही मागणी केली आहे. अॅड. कोकाटे यांना मंत्री पदाबाबत विचारले असता, ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी जबाबदारी दिली आहे. ती व्यवस्थित पार पाडायची आहे. कोणत्याही खात्यासाठी माझा आग्रह नव्हता. मला कोणतेही खाते दिले असते, तरी मी काम करणार होतो. मला अगदी समुद्राच्या लाटा मोजायला लावल्या असत्या तरी ते मला चालले असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री पदाबाबत विचारले असता ते म्हणाले, या पदावर आमचाच दावा राहणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पालकमंत्री होईल. जिल्ह्यामध्ये आमचे सात आमदार आहेत. नियम व धोरणाप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्या जिल्ह्याला पालकमंत्री पद दिले जाते. त्यामुळे याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अवगत करणार असून, त्यांच्याकडे याबाबत मागणीही केली आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहील, असेही मंत्री अॅड. कोकाटे यांनी स्पष्ट केले.


