Solapur Politics: सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारा भाजप प्रवेश कार्यक्रम आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि काँग्रेसचे एक माजी आमदार भाजपत प्रवेश करणार असल्याची घोषणा झाल्यानंतर स्थानिक राजकारणात चांगलाच गदारोळ उडाला आहे. मात्र, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
‘ऑपरेशन लोटस’ की ‘ऑपरेशन फेल’?
भाजपमध्ये प्रवेशासाठी तयार असलेल्यांमध्ये काँग्रेसचे दिलीप माने, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह व विक्रमसिंह शिंदे यांचा समावेश आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीने या नेत्यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. याच चर्चेनुसार २७ ऑक्टोबर रोजी मुंबईत पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी दिलीप माने यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध करत पक्ष कार्यालयासमोर धरणे आंदोलन केल्याने भाजप नेतृत्वाला कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. त्यामुळे गोरे यांचा ‘राजकीय मास्टरस्ट्रोक’ यशस्वी ठरेल की अयशस्वी, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अजित पवार नाराज
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या पक्षातील माजी आमदारांना भाजप प्रवेश न देण्याबाबत भाजपकडे हरकती घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या प्रवेशाला भाजप उच्चस्तरीय चर्चेची गरज निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी (२६ ऑक्टोबर) मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासाठी येणार होते. त्या दौऱ्यातच या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने आणि विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवेश सोहळा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोलापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी दिलीप माने यांच्या विरोधात आंदोलन करत स्थानिकांचा अपमान करणाऱ्यांना पक्षात घेऊ नये, अशी मागणी केली आहे. या आंदोलनाचा अहवाल जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी भाजप प्रदेश कार्यालयाला पाठविला आहे. अहवालात पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्याशिवाय कोणाचाही प्रवेश मंजूर करू नये.
सोलापूरच्या राजकारणात नवी समीकरणं
या सर्व घडामोडींमुळे सोलापूर जिल्ह्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपमध्ये संभाव्य प्रवेश करणारे माजी आमदार अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहेत, मात्र कार्यकर्त्यांचा विरोध आणि अजित पवारांची नाराजी पाहता, या प्रवेशाचा राजकीय शेवट काय होईल, याकडे राज्याचं लक्ष केंद्रीत झालं आहे.


