Pune Crime: पुण्यातील हडपसरमधील रामटेकडी परिसरात फटाक्यांच्या वादातून उसळलेल्या हिंसक संघर्षात एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेली ही घटना स्थानिक रहिवाशांना हादरवणारी ठरली आहे. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही कुटुंबांविरुद्ध परस्पर तक्रारी नोंदवल्या आहेत.
फटाक्यांच्या वादातून चिघळला वाद
ही घटना २१ ऑक्टोबर रोजी रामटेकडी पिवाला चौक परिसरात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, लकी सिंग कल्याणी या व्यक्तीने आपल्या दुकानाजवळ फटाके फोडले, त्यावरून ठोसर कुटुंबातील सदस्यांनी त्याला आगीचा धोका असल्याची सूचना दिली. मात्र, छोट्या शब्दांच्या वादातूनच हाणामारीला सुरुवात झाली आणि पाहता पाहता हा वाद रक्तरंजित संघर्षात परिवर्तित झाला.
लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला
लकी सिंगसोबत त्याचे नातेवाईक खन्ना सिंग, जल्लू सिंग, जस्सू सिंग, अर्जुन सिंग आणि गोविंद सिंग कल्याणी यांनी मिळून ठोसर कुटुंबावर लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात जितेंद्र परमेश्वर ठोसर (वय ३२) याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जखमींमध्ये अनिता विश्वजीत ठोसर, अश्विनी जितेंद्र ठोसर, विश्वजीत ठोसर आणि वंश ठोसर यांचा समावेश आहे.
हेही वाचा – मोठी बातमी..! सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पहिली अटक
पोलिसांची तात्काळ कारवाई
घटनेनंतर वानवडी पोलिसांनी दोन्ही कुटुंबांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. जितेंद्रच्या मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्ह्यात कलम ३०२ (खून) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी जोडल्या आहेत. कल्याणी कुटुंबातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून, इतर आरोपी फरार आहेत. सर्व आरोपी रामटेकडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी पीडिताच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक रहिवाशांनी वानवडी पोलिस ठाण्याबाहेर निदर्शनं केली. त्यांनी सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी परिसरात तणाव लक्षात घेता बंदोबस्त वाढवला असून, शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.


