Pune Cyber Fraud: पुण्यातील एका ७५ वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरला ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या जाळ्यात ओढून सायबर गुन्हेगारांनी चक्क १२.३१ कोटी रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली असून, या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘व्हॉट्सॲप’ ग्रुपच्या माध्यमातून जाळ्यात ओढले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीची सुरुवात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एका अनोळखी मेसेजने झाली. या मेसेजमधील लिंकवर क्लिक करताच डॉक्टरांना एका ‘व्हॉट्सॲप’ ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. या ग्रुपचा ॲडमिन स्वतःला एका आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेचा मोठा अधिकारी असल्याचे सांगत होता, तर दुसऱ्या एका आरोपीने आपण शेअर बाजारावरील पुस्तकांचे लेखक असल्याचे भासवून डॉक्टरांचा विश्वास संपादन केला.
बनावट ॲप्लिकेशन आणि नफ्याचा आभास
जेव्हा डॉक्टरांनी गुंतवणुकीत रस दाखवला, तेव्हा त्यांना एका नामांकित कंपनीच्या नावाशी मिळतेजुळते असलेल्या बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशनवर नेण्यात आले. या ॲपवर डॉक्टरांनी गुंतवलेले पैसे आणि त्यावर मिळणारा नफा यांची खोटी आकडेवारी दर्शवली जात होती. प्रत्यक्षात मात्र, हे सर्व पैसे भामट्यांच्या विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले जात होते. ७ मार्च ते १८ मार्च या अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत डॉक्टरांनी तब्बल ८ व्यवहारांद्वारे १२.३१ कोटी रुपये गुंतवले.
५४ कोटींचा काल्पनिक नफा आणि धमकीचे सत्र
काही दिवसांनी त्या बनावट ॲपवर डॉक्टरांना ५४ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे दिसले. मात्र, जेव्हा त्यांनी हे पैसे काढून घेण्याचा (Withdraw) प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी त्यांना आणखी पैशांची मागणी केली. डॉक्टरांनी नकार देताच, त्यांची मालमत्ता जप्त करण्याची धमकी देऊन त्यांना मानसिक दडपणाखाली आणले गेले. यावेळी आपली मोठी फसवणूक झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.
सायबर पोलिसांकडून तपास सुरू
पीडित डॉक्टरांच्या तक्रारीवरून पुणे सायबर पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवला आहे. ज्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत, त्यांचा तपास सुरू असून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ७५ वर्षीय सुशिक्षित व्यक्तीला अशा प्रकारे लुटल्या गेल्यामुळे पुणे शहरात खळबळ माजली असून, नागरिकांनी अनोळखी लिंक आणि गुंतवणुकीच्या आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


