बीड: जिल्ह्यातील इमामापूर रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांना हादरवून टाकणाऱ्या या घटनेत एका तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिचे ओठ गडद निळे-काळे झाल्याने गुदमरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे फक्त दोन दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचा, जयराम बोराडे, मृतदेह त्याच परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.
मुलगी बेपत्ता, मृतदेह आढळल्याने गूढ वाढले
वृत्तानुसार, बोराडे आपल्या मुलीसह घराबाहेर पडले होते. त्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याने शोधमोहीम राबवली जात होती. दुर्दैवाने, आज सकाळी तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे या दोन मृत्यूंच्या घटनांमध्ये काय संबंध आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
तपास सुरु
प्राथमिक निरीक्षणांनुसार वडिलांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे दिसत असले तरी, चिमुरडीचा मृतदेह आढळल्यानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. पोलिसांनी यामागे घातपात, जबरदस्तीने फाशी देण्याची शक्यता किंवा वडिलांच्या मृत्यूशी असलेला संभाव्य संबंध तपासायला सुरुवात केली आहे. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चौकशी सुरू केली आहे.
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
सलग दोन दिवसांत एकाच कुटुंबातील दोन सदस्यांचे मृतदेह एकाच परिसरात सापडल्याने गावकऱ्यांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमागील खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


