Beed Crime : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ट्युशनला जाणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या या पीडित मुलीची ओळख धीरज सांजुरे या तरुणाशी झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत धीरजने ६ जानेवारी रोजी मुलीला फिरायला नेण्याचे आमिष दाखवले. दुसऱ्या दिवशी, ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता मुलगी केज येथे ट्युशनला जाण्यासाठी आली असता, आरोपीने तिला कारमध्ये बसवून पळवले.
पीडितेवर बळजबरीने अत्याचार
त्यानंतर तिला धारूर तालुक्यातील अंबाचोंडी येथील निर्जन डोंगराळ भागात नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वीही आरोपीने अशाच प्रकारे तिला या डोंगराळ भागात नेले होते. या नराधमाच्या कृत्यामुळे बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा – Beed Crime: बीडमध्ये दिवसाढवळ्या थरार! खड्डा खोदणाऱ्या मजुराची गोळी झाडून हत्या
गुन्हेगारीने बीड जिल्हा हादरला
जिल्ह्यात केवळ महिलांवरील अत्याचारच नव्हे, तर इतर गंभीर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढल्याचे चित्र आहे. मंगळवारी दुपारी अंकुश नगर परिसरात एका तरुणाची भररस्त्यात गोळ्या झाडून आणि नंतर शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एकामागून एक घडणाऱ्या या हिंसक घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कायदा व सुव्यवस्थेचा धाक संपला आहे का? असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे.


