Child Marriage Case: नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मलापूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इयत्ता ८ वीमध्ये शिकणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या 35 वर्षीय पुरुषाशी लावून देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, 23 मार्च 2026 पर्यंत ही मुलगी नियमित शाळेत जात होती. मात्र, तिच्या आईने तिला शाळेतून घरी आणले आणि 26 मार्च रोजी एका धार्मिक विधीच्या नावाखाली हा बालविवाह पार पडला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तातडीने धाव घेत मुलीला आपल्या ताब्यात घेतले.
मुलीची विक्री की विवाह? मध्यस्थ महिलेची कसून चौकशी
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचा जन्म 2010 मध्ये झाला असून ती अद्याप अल्पवयीन आहे. तपासणी दरम्यान या विवाहात मध्यस्थी करणाऱ्या एका महिलेचे नाव समोर आले आहे. हा विवाह केवळ कौटुंबिक निर्णयाचा भाग होता की त्या मुलीची पैशांसाठी विक्री करण्यात आली, या दिशेने पोलीस आता तपास करत आहेत. पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्या आधारे ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या मुलीला सुरक्षिततेसाठी बाल सुधारगृहात हलवण्यात आले आहे.
पुरोहित, स्वयंपाकी आणि पाहुण्यांवरही होणार गुन्हे दाखल
बालविवाह हा केवळ सामाजिक शाप नसून तो एक गंभीर फौजदारी गुन्हा आहे. मुश्ताक पठाण यांनी स्पष्ट केले की, या विवाहात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई केली जाईल. यामध्ये विवाह लावणारे पुरोहित, जेवण बनवणारे स्वयंपाकी, वऱ्हाडी मंडळी आणि उपस्थित पाहुण्यांचाही समावेश असेल. बालविवाहास प्रोत्साहन देणे किंवा त्याला मूक संमती देणे हादेखील गुन्हा असल्याने, या सर्वांना आरोपी म्हणून गुन्ह्यात समाविष्ट करण्याची विनंती पोलिसांना करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण आता बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले असून मुलीच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू आहेत.


