Pimpri Chinchwad Crime: औद्योगिक नगरीतील स्पा सेंटर आणि लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने शहराच्या विविध भागांत छापे टाकून वेश्या व्यवसायाचे रॅकेट उद्ध्वस्त केले असून, एकूण 8 महिलांची या नरकयातनेतून सुटका केली आहे.
शहरात विविध ठिकाणी पोलिसांचे छापे
पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखेने एकाच वेळी अनेक ठिकाणी ही कारवाई केली. वाकडमधील विशालनगर येथील ‘इंटरनल फॅमिली स्पा’वर रात्री 10 च्या सुमारास धाड टाकून 4 महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी महिला चालकासह मॅनेजर अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम याला अटक करण्यात आली आहे. तसेच निगडीतील ‘ईगल स्पा’मधून 2 महिलांची सुटका करण्यात आली. येथे अधिक पैशांचे आमिष दाखवून महिलांना या व्यवसायात ओढले जात असल्याचे समोर आले आहे.
लॉजवरही कारवाईचा बडगा
केवळ स्पा सेंटर्सच नव्हे, तर लॉजमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. आळंदीतील ‘योगीराज लॉज’ आणि सांगवी परिसरातील ‘कृष्णा लॉज’वर छापे टाकून प्रत्येकी एका महिलेची सुटका करण्यात आली. या कारवायांमुळे अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
3 आस्थापनांवर एक वर्षाची बंदी
केवळ गुन्हे दाखल करून न थांबता, पोलीस प्रशासनाने अशा ठिकाणांवर कायमची टाळेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात पिंपरी-चिंचवडमधील तीन प्रमुख ठिकाणांवर एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे: 1. निक्की लॉज (चिंचवड) 2. लेमन ग्रास थाई स्पा (काळेवाडी) 3. औरा थाई स्पा (सांगवी)
आकडेवारीतून भयावह वास्तव
पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025 या वर्षात आतापर्यंत पोलिसांनी मोठी मजल मारली आहे. एकूण 25 स्पा सेंटर्सवर कारवाई करण्यात आली असून, 45 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण मोहिमेत आतापर्यंत 63 पीडित महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे.


